श्री श्रृंगेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर
Published by उदयसिंह मानसिंगराव राजेयादव in Mythology of Kolhapur · Thursday 12 Aug 2021
Tags: Shri, Shrungeshwar, Kolhapur
Tags: Shri, Shrungeshwar, Kolhapur
श्री श्रृंगेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर यात्रानुक्रम मालिकेतील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री श्रृंगेश्वर महादेव मंदिर.
कोल्हापुर पंचगंगा नदी घाट श्री सिद्धेश्वर महाराज - गुरु महाराज मंदिराहून तसेच शेतवटातून पुढे गेल्यावर पंचगंगा नदी तिरापासून थोड्या अंतरावर जमिनीपासून पाच सहा फूट उंच टेकाडावर हे श्री श्रृंगेश्वर - महादेव मंदिर आहे. ऊस शेती, झाडेझुडपे यातून मार्गक्रम हे सर्व कठीणप्रद आहे. यापेक्षा श्री उत्तरेश्वर महादेव मंदीर उत्तरेश्र्वर पेठ येथून शिंगणापूर- लक्षतीर्थ वसाहतीकडे जाणारा चांगला डांबरी- खडीचा पक्का रस्ता बनवलेला आहे. या रस्त्याने थोडे पुढे आल्यावर एक ओढा- नदी आणि त्यावर पुल आढळतो. येथून उजव्या बाजूला गाडीवाट स्वरूपाचा कच्चा रस्ता आहे. या कच्च्या रस्त्यावरून काटकोन स्वरूपातील तीन चार वळणे घेताच मंदिर दृष्टिक्षेपात पडते. पावसाळ्यातील दिवसात रस्त्यात वाढलेले गवत, घसरण, चिखलगुठ्ठा पणा यामुळे मार्गक्रमण अशक्यप्रद असते. पावसाळा सोडून एरवीच्या दिवसात मंदिरापर्यंत गाडीने आरामात पोहोचू शकतो. सहज सुलभ दर्शन घडू शकते.
या शेतवटातील गाडीवाट, पायवाटेने मंदिरापर्यंत पोहोचताच पन्नास बाय शंभर असा दगड माती स्वरूपातील चार पाच फुटाचा उंचवठा- टेकडी सदृश्य भाग दिसून येतो. सभोवताली चिंच, रामफळ अशी नैसर्गिक झाडी आहे. या उंचवट्याच्या मधोमध हे श्री श्रृंगेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिर वीस बाय पंचेचाळीस दगडी बांधीव एक पाकी आहे. पुढे नंदीमंडप तर पंधरा बाय पंधरा गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप. या दगडी जुन्या मंदिरास अलीकडील काळात सिमेंटचा गिलावा डागडुजी करत मंदिर सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गर्भगृहात श्री श्रृंगॠषी यांचे लिंग स्वरूपातील स्थान हे उत्तराभिमुख शिवपिंडी स्वरूपात असून या शिवपिंडी च्या पाठीमागे प्रभू श्रीराम यांची बहीण शांता यांचे लिंग स्वरूपातील स्थान आहे. आता येथे गिरीगोसावी वगैरे कोणी नाहीत परंतु जुन्या काळात काही गोसावी, बैरागी येथे रहात असल्यामुळे या स्थानाची ओळख गोसाव्यांचा मठ अशीच बनली होती.
मंदिराच्या ईशान्य दिशेला पाच बाय पाच दगडी एक बाकी प्राचीन जसेच्या तसे एक मंदिर आहे. हे मंदिर गिरीगोसावी स्वामींचे समाधिस्थान आहे. याचबरोबर मंदिराच्या पुढे तसेच पाठीमागील बाजूस ही गिरी गोसावी यांची समाधी दगडी शिल्पे पादुका शिवलिंग स्वरूपात दिसून येतात. हेमाडपंती शैलीतील जुन्या बांधकामाचे वेल बुट्टी, पान त्रिकोण स्वरूपातील दगड ही मंदिर परिसरात आढळून येतात. मंदिरा सभोवती असणारी रामफळाची झाडे म्हणजे कौसल्येचा राम कृपा दृष्टी दिसून येते. खरे तर हे स्थान प्रभू श्रीराम यांची थोरली बहीण कौसल्या पुत्री शांता हिचे स्थान आहे. प्रभू श्रीराम यांची बहीण शांता तिचे पती म्हणजे हे श्री श्रृंगॠषी होय. महाभारत रामायण काळ म्हणजे सत्य आणि धर्म यांचे स्थान सर्वात उंच होते. आपल्या साधनेच्या जोरावर ऋषी मुनी साधवी अशक्य बाबीही सहज साध्य करत असत. काही वेळेस अजिबो गरिब घटना कधी घडत हे ही लक्षात येत नसे.
ऋषी श्रृंगी हे महात्मा विभांण्डक यांचे पुत्र होते. ऋषी विभांण्डक एक कठोर तपस्वी होते. त्यांच्या तपसाधनेमुळे देवराज इंद्र ही काळजीत पडले होते. देवराज इंद्र यांना वाटू लागले की, घनघोर कठोर तपस्या यामुळे इंद्रराज्यही हे प्राप्त करतील की काय? असे त्यांना मनोमन वाटू लागले. यामुळेच त्यांनी उर्वशी नावाच्या अप्सरेला तपसाधना भंग करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले होते. एकदा सरोवरामध्ये श्री विभांण्डक ऋषी स्नानासाठी गेले असता उर्वशी तेथे पोहोचली. कामुक सोंदर्य यामुळे विभांण्डक ऋषीं चे वीर्य विस्कळीत झाले होते. यामुळे विभांण्डक ऋषीं च्या तपोबल यामध्ये खंड पडून विभांण्डक ऋषी आश्रमात गेल्यानंतर तहानलेली हरणी त्या सरोवराजवळ येते आणि पाणी पिताना ते वीर्य प्राशन करते. त्यामुळे ती हरणी गर्भ धारण करते. ती हरिणी म्हणजे एक देवकन्या होती. ब्रह्माजींनी शाप दिल्यामुळे तिचे हरिणीत रूपांतर झाले होते. देवकन्येने ब्रह्माजी यांची क्षमा मागितल्यावर हरणी जातीतून तू एका पुत्राला जन्म देशील त्यावेळी तुझी पापातून सुटका होऊन देवलोक प्राप्त करशील असा उःशाप मिळाला होता. हरिणीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर देवकन्येस देवलोक प्राप्त झाले. त्या मुलाचा जन्म हरणीच्या पोटातून झाल्यामुळे हरिणी प्रमाणे त्या बाळाच्या डोक्यावर एक छोटे शिंग होते. यामुळेच त्या मुलाचे नाव श्रृंगी असे पडले. उर्वशी अप्सरा तसेच हरिणी देवकन्या यांना श्रृंगी ऋषींची आई माता मानले जाते. पण या सुंदर लहान बाळाला इथे सोडून गेल्यामुळे विभांण्डक ऋषींना स्त्रियांबद्दल प्रचंड घृणा होती. यामुळे ऋषी विभांण्डक यांनी त्या लहान बाळाचे पालनपोषण करून वाढविले. याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन करणारा तपस्वी ही त्यांनीच बनवले. यामुळे ऋषी श्रृंगी यांनी कधीही स्त्रियांना पाहिले नव्हते. ऋषी विभांण्डक, श्रृंगी ज्या वनात राहत होते तो वन भाग अगंजनपद राज्याचा भाग होता.
त्यावेळी त्या राज्यावर रोमपद नावाचा राजा राज्य करत होता. एकदा त्या राज्यात भयानक दुष्काळ, सुखा पडल्यामुळे मोठे संकट आले. यावेळी राजाने विचारवंतांचा सल्ला घेतल्यानंतर एक बाब पुढे आली की, जर ऋषी श्रृंगी यांना नगरात आणले तर त्याच्या कृपेमुळे राज्याचा दुष्काळ दूर होईल. पाऊस होईल. पण ऋषी श्रृंगी यांना नगरात आणणे तेवढे सोपे नव्हते. काही सुंदर दासींना ऋषी श्रृंगीजवळ सेवेस पाठवले. परंतु याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी ऋषी श्रृंगी नगरांत जावयास तयार झाले. नगरात येताच भरपूर पाऊस झाला. ही गोष्ट ऋषी विभांण्डक यांना समजली. यावेळी विभांण्डक ऋषींच्या क्रोधा पासून वाचण्यासाठी राजा रोमपद यांनी दत्तक पुत्री, राजा दशरथ- कौशल्या पुत्री शांता आणि ऋषी श्रृंगी यांचा विवाह लावून दिला. राजा रोमपद यांच्या सल्ल्यानुसार राजा दशरथ यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. या यज्ञाची सर्व जबाबदारी ऋषी श्रृंगी यांनी घेतली होती. यामुळेच प्रभु श्रीराम, लक्ष्मण ,भरत ,शत्रुघ्न ही मुले राजा दशरथ यांना झाली. ऋषी श्रृंगी म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या बहिणीचे पती- नवरा होते. कुंडलिनी शक्ती वर मिळवलेला विजय ही ऋषी श्रृंगी यांची कठोर तपसाधना होती.तुलशीदास विरचित "रामचरितमानस "या ग्रंथासह "करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता" अशा अनेक जुन्या ,प्राचीन ग्रंथात ऋषी श्रृंगी यांचा उल्लेख दिसून येतो. करवीर नगरी ही सर्वश्रेष्ठ दक्षिण काशी क्षेत्र असल्यामुळे येथे सर्व देवदेवता ऋषीमुनी यांचे स्थान महात्म्य लाभलेले आहे. असे हे प्रभू श्रीराम यांची थोरली बहीण शांता आणि ऋषी श्रृंगी यांचे स्थान महात्म्य लाभलेले ठिकाण म्हणजे श्री श्रृंगेश्वर महादेव मंदिर.
उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,
कोल्हापूर.