श्री कल्लेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर

Go to content

श्री कल्लेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर

Ambabai Mahalaxmi Kolhapur
श्री कल्लेश्वर : दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन ग्रंथात नामोल्लेख असलेले स्थान महात्म्य देवता म्हणजे श्री कल्लेश्वर-  महादेव मंदिर.

श्री क्षेत्र कल्लेश्वर, अब्दुल लाट कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गाव. इचलकरंजी- कुरुंदवाड रस्त्यावरील हे एक समृद्ध गाव. कोल्हापूर ते इचलकरंजी साधारण तीस किलोमीटर अंतर आणि इचलकरंजी ते अब्दुल लाट हे जेमतेम बारा किलोमीटर अंतर. पंचगंगा आणि दुधगंगा नद्यांवरील अत्यंत समृद्ध, मनमोहक असलेले हे गाव. गावाला पौराणिक-प्राचीन इतिहास तसाच मध्ययुगीन इतिहास ही रंजक आहे.                करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीस मुस्लिम राजवटीत अनेक गावे इनाम दिल्याची फारशी, मोडी कागदपत्रे पहावयास मिळतात. यामध्ये आदिलशाही सनदा पत्रामध्ये लाट हे गाव दिसून येते. अब्दुला नावाच्या प्रसिद्ध सुभेदारामुळे अब्दुल लाट ही नामावली तयार झाली आहे. पुढे छत्रपतींच्या राजवटीतही अब्दुल लाट या गावाहून श्री महालक्ष्मीस गावगना जमा करण्यात यावे अशी सनदा पत्रे आढळून येतात. जसे छत्रपती, आदिलशहा राजवटीतील संदर्भ आढळून येतात तसे यादव राजवटीतील ही संदर्भ दिसून येतात. कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक अशोक मानकर यांनी यावर संशोधनही केले आहे. मंदिरा शेजारील एका घराच्या भिंतीला उभा करून ठेवलेले उभट आकारातील शिल्प, लेख येथे दिसून येतात. ग्रामस्थ त्यांची देव म्हणून पूजा करतात. हा गधगळीचा शिलालेख आहे. या लेखाच्या वरील भाग तुटून खाली पडलेला असून  या तुटलेल्या दगडावर गाढव तसेच स्त्री क्रोमी चे चिन्ह-चित्र कोरले आहे. हे स्त्री क्रोमी मैथुन शिल्प आहे. या गधगळीच्या डाव्या बाजूस सूर्य आणि उजव्या बाजूस चंद्र तर मध्यभागी श्री महादेवाची पिंडी आहे. देवगिरी सम्राट राजा सिंघणदेव याचा इथे कन्नड शिलालेख पाहावयास मिळतो. श्री कल्लेश्वराला स्मरण करून लेख वर्णन आहे. मंदिरासमोर खांब स्वरूपातील दगडी दिपमाळ आहे तर पेविंग ब्लॉक-ठोकळे फरशी बसवत परिसर सुशोभित करण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेरून तटबंदी आत मध्ये मोठा मोकळा परिसर आणि आतील मंदिर ही भव्य दगडी मंदिर असा एकंदरीत हा परिसर आहे. मुस्लिम काळातील कमानी, घुमटाकृती आकारातील दगडी प्रवेशद्वार तर अलीकडील काळात मंदिराचे नुतनीकरण करून गोकाकच्या खडकातून सुंदर घडवलेले कोरीव खांब, महिरपी स्वरूपातील मनमोहक नक्षीकाम, कोरीव शिल्प, नंदी शिल्प अशा कलाकृतीतील गर्भग्रह, मंडप तर आर.सी.सी. स्वरूपातील शिखर बांधणी, आकर्षक रंगरंगोटी करत,  जुन्या-नव्याचा संगम साधत मंदिराचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला आहे.

दरवर्षी नरक चतुर्दशीस गावात एक चैतन्यमय वातावरण असते ते म्हणजे दिवाळी बरोबर श्री कल्लेश्वर यांची यात्रा म्हणून. श्री कल्लेश्वर म्हणजे महादेवांचाच अवतार. पण इथे पिंडीमध्ये हर आणि हरी दोन्ही वास करतात अशी भाविकांची श्रद्धा. यात्रेतील उत्साहाची ही परंपरा एक आगळीवेगळी पर्वणी असते. माया-लेखी तसेच काम धंद्या निमित्त गावा बाहेर गेलेल्या मंडळींना यात्रेच्या निमित्ताने लागलेली श्री कल्लेश्वराच्या दर्शनाची ओढ, विविध जाती- पंथ यांनी एकत्र येऊन केलेला उत्सव, श्री कल्लेश्वराची मूर्ती आणि सजावट ही एक वेगळीच मनमोहकता असते. उत्सवानिमित्त केलेली मुखवट्यांची सजावट आणि सजावटीत वेगवेगळ्या धान्यांचा वापर केला जातो. चौसष्ठ किलो धान्य यामध्ये हरभरा डाळ, गहू, तांदूळ, उडीद डाळ, खाऊची पाने आणि पाणी यापासून सण-उत्सवा निमित्त आकर्षक पूजा बांधली जाते. पंचक्रोशीत ही यात्रा प्रसिद्ध आहे.

लाटवाडीतील लक्ष्मी, अब्दुल लाट मधील बिरोबा आणि विठुराया हे तिन्ही देव आपापल्या पालखीत बसत गजी ढोलाच्या तालावर वाजत गाजत भंडारा उधळत श्री कल्लेश्वर मंदिरात पोहचतात. हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत, सर्व समाजातील मानकऱ्याच्या उपस्थितीत पालखी सोहळा होतो. यात्रेवेळी दहा हजाराहून अधिक नारळ मंदिरावर फोडले जातात. नारळ फोडून आपला अहंकार नष्ट करतो अशी त्यामागे भाविकांची श्रद्धा असते. ढोलाचा नाद, हजारोंच्या संख्येने मंदिराकडे झेपावणारे नारळ हा सोहळा प्रत्यक्ष पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे आहे. हेडंब ही एक यात्रेतील महत्त्वाची प्रथा. यात सहभागी मंदिराच्या मोकळ्या चौकात येतात. समाजातील प्रमुख व्यक्ती एका व्यक्तीला भंडारा लावून हातात तलवार देतात. सहभाग घेणारी व्यक्ती गजी ढोला सोबत ताल धरते आणि हातातील तलवार पोठावर मारुन घ्यायला सुरुवात करते. यानंतर भविष्याची केलेली भाकित म्हणजे भाकणूक सोहळा होतो. धनगर समाजातील प्रमुख व्यक्ती संकेताचा अर्थ सामान्य भक्तांना समजून सांगतात. शैव आणि वैष्णव यांचे प्रतीक असणारे हे मंदिर असल्यामुळे येथील शिवपिंडी समोर दोन श्री नंदी मूर्ती दिसून येतात. अलिकडे सुशोभीकरण केलेल्या श्री कल्लेश्वर तलाव हे श्री कल्लेश्वर देवाचे तीर्थकुंड आहे.

असे हे प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे इचलकरंजी जवळील अब्दुल लाट येथील श्री कल्लेश्वर-  महादेव मंदिर.

उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,
कोल्हापूर.
मोबाईल नंबर  - 9370101293.



Back to content