दुर्गाशक्ती - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content
'नव'दुर्गांची ओळख करून घेऊया श्री. विनीत वर्तक यांच्या लेखणीतून.
श्री. विनीत वर्तक यांच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

#दुर्गाशक्ती (भाग ९)

पद्मश्री सुधा मूर्ती. -विनीत वर्तक


एप्रिल १९७४ चा काळ होता. आय.आय.एस.सी. च्या नोटीस बोर्ड वर एक सूचना लागली होती. टाटांच्या पुणे येथील टेल्को कंपनीसाठी अभियंते हवे होते. पण त्या नोटीशीच्या खालच्या बाजूस लहान अक्षरात लिहिलं होतं “स्त्रियांनी अर्ज करू नये” तिथे शिकणाऱ्या तरुण सुधा मूर्तींच्या मनात हे वाक्य खूप टोचलं. आपण कुठे कमी आहोत मग आपल्याला नाकारण्याचा अधिकार टाटा नां कोणी दिला. सुधा मूर्ती नी मागचा पुढचा विचार न करता एका पोस्टकार्ड वर जेआरडी टाटांना एक पत्र लिहिलं. त्यात मजकूर होता
"The great Tatas have always been pioneers. They are the people who started the basic infrastructure industries in India, such as iron and steel, chemicals, textiles and locomotives. They have cared for higher education in India since 1900 and they were responsible for the establishment of the Indian Institute of Science. Fortunately, I study there. But I am surprised how a company such as Telco is discriminating on the basis of gender."
ह्या पत्रानंतर त्यांना लगेच टेल्को कडून बोलावणं आलं. एक स्त्री म्हणून आपल्याला कमी लेखलं गेल्याची खंत त्यांना भारतातल्या सगळ्यात मोठ्या गाड्या बनवणाऱ्या कंपनीत पहिल्या महिला इंजिनिअर म्हणून नोकरी देऊन गेली. पुरुषसत्ताक आणि पुरूषांच क्षेत्र मानल्या गेलेल्या औद्योगिक क्षेत्रात स्त्री म्हणून आपण कुठे कमी आहोत अस न मानता आपल्या अन्यायाचा सामना कणखरपणे करताना भारताच्या औद्योगिक क्षेत्रात स्त्रियांना स्थान देण्याच श्रेय नक्कीच सुधा मूर्ती ह्यांना जाते. सुधा मूर्ती ह्यांना टाटा मध्ये घ्यायला कारण जेआरडी टाटांनी घेतलेली पत्राची दखल नुसती कारणीभूत नव्हती तर सुधा मूर्तीच्या कर्तुत्वाच नाणं ही तितकचं खणखणीत होतं.
एका सध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेल्या सुधा मूर्ती लहानपणापासून खूप हुशार होत्या. आपली पदवी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांनतर त्यांनी आपलं पदवित्युर शिक्षण पण प्रथम क्रमांकाने आय.आय.एस.सी. इकडून उत्तीर्ण केलं. त्यासाठी त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर कडून गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे. त्यांची ओळख नंतर नारायण मुर्तींशी झाली.
लग्नानंतर आपली कंपनी काढण्याचा निर्णय सुधा आणि नारायण मूर्ती नी घेतला. ह्या वेळेस पण आपल्या नवऱ्याला तोलामोलाची साथ देताना आपल्याजवळ जमवलेले १०,००० रुपये त्यांनी इन्फोसिस च्या निर्मितीसाठी दिले. ते देताना त्यांनी नारायण मूर्ती ना सांगितल की पुढली ३ वर्ष ती घराची पूर्ण काळजी आणि खर्च बघेल तुम्ही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. नारायण मूर्ती आपल्या घरीच इन्फोसिस च ऑफिस बनवलं असताना सुधा मूर्ती नी वालचंद ग्रुप मध्ये जॉब करायला सुरवात केली. एकाच वेळी जेवण बनवणारी, घर सांभाळणारी त्या सोबत एक क्लार्क आणि इन्फोसिस ची प्रोग्रामर अश्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी नारायण मूर्ती ना इन्फोसिस च्या उभारणीत पूर्ण सहकार्य केलं.
इन्फोसिस वाढत गेली त्यासोबत सुधा मूर्ती श्रीमंत होत गेल्या. पण गर्वाचा लवलेश आणि पैश्याचा माज आपल्याला त्यांनी कधी चिकटू दिला नाही. आजच्या घडीला सुधा मूर्ती भारतातील सगळ्यात श्रीमंत स्त्रियांपेकी एक आहेत. आज ७७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळकत सुधा मूर्तींची आहे. त्यांच्या मते
"Money can give you certain comforts but money has limited use. And once you realise that, money becomes a burden to you. You donate it. Money is a heavy bag on your back and you should lead a simple lightweight life".
"No jewellery or saris for me… I have everything I need"
इतका प्रचंड पैसा असताना सुद्धा आगदी साधं आयुष्य जगण्यात सुधा मूर्ती समाधान मानतात. साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी ह्याच मूर्तिमंत उदाहरण त्यांनी भारतातील सगळ्याच स्त्रियांसमोर ठेवलं आहे.
टाटा सोडताना जेआरडी टाटा नीं सुधा मूर्तीना काही उपदेशाचे बोल सांगितले होते. जे सुधा मूर्ती नी नेहमीच लक्षात ठेवले.
"If you make lots of money you must give it back to society as you have received so much love from it".
जेआरडी च्या शब्दाला जागत सुधा मूर्ती नी १९९७ मध्ये इन्फोसिस फौंडेशन ची स्थपना केली. ह्या माध्यमातून त्यांनी अनेक हॉस्पिटल, शाळा, अनाथश्रम बांधले. प्रत्येक शाळेत ग्रंथालय असलं पाहिजे ह्या आपल्या स्वप्नाला त्यांनी आकार द्यायला सुरवात केली त्यातून आजवर ५०,००० ग्रंथालयांची स्थापना त्यांनी केली आहे. १०,००० पेक्षा जास्त स्वच्छतागृह त्यांनी उभी केली आहेत. २३०० पेक्षा जास्त घर पुराचा फटका बसलेल्या भागात बांधलेली आहेत. आपल्या स्वबळावर त्यांनी तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, ओरिसा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश अश्या राज्यातील दुष्काळग्रस्त आणि वादळात, पुरात, त्सुनामी च्या तडाख्यात सापडलेल्या अनेक कुटुंबाची मदत केली आहे. त्यांच्या ह्या सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांना २००६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
फक्त पैसा दिला म्हणजे मदत होत नाही तर त्यापलीकडे खूप काही करण्यासारखं असते हा आदर्श ठेवताना सुधा मूर्ती सांगतात,
“Donating 100 crore isn’t more valuable than teaching 100 children”
आपल्या आयुष्याचा अनुभव शब्दातून मांडताना सुधा मूर्ती ह्यांनी आजवर २४ पेक्षा जास्त पुस्तक लिहली असून आजवर त्याच्या १५ लाखापेक्षा जास्ती प्रती विकल्या गेल्या आहेत. भारतातील सगळ्यात प्रभावी आणि प्रसिद्ध लेखिकांमध्ये सुधा मूर्ती ह्याचं नाव सगळ्यात वरती येतं.
इन्फोसिस फौंडेशन च्या कामानिमित्त महिन्यातले २० दिवस गावातून फिरत असताना पण इतक्या सगळ्या व्यापातून पण त्यांनी आपले छंद जोपासले आहेत. चित्रपट बघण्याच त्यांना प्रचंड वेड आहे. टेल्को मध्ये असताना प्रत्येक दिवशी एक चित्रपट बघण्याच च्यालेंज ही त्यांनी जिंकल आहे. आजही त्यांच्याकडे डी.व्ही.डी चा मोठा संग्रह असून त्या एका मुलखातीत म्हणाल्या होत्या, “जर मी आज जी आहे ती झाली नसते तर चित्रपटांची पत्रकार झाले असते’.
“I have 500 DVDs that I watch in my home theatre. I see a film in totality – its direction, editing… all aspects. People know me as a social worker, as an author… but no one knows me as a movie buff. That’s why I am glad to do this interview with Filmfare. I could have actually become a film journalist. I never get bored of movies!”
सुधा मूर्ती ना ह्या प्रवासात कटू अनुभव ही आले. लंडन मध्ये एका हाय फाय स्त्री ने सलवार कमीज मध्ये असलेल्या सुधा मूर्ती ना ‘cattle class’ अस म्हंटल. तिच स्त्री नंतर सुधा मूर्ती च लेक्चर ऐकण्यासाठी त्याच हॉल मध्ये बसली होती. कपड्यावरून माणसाची उंची ठरवणाऱ्या लोकांमध्ये ही सुधा मूर्ती ह्यांनी आपलं वेगळेपण आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिलं. एकदा अमेरिका एकटीने फिरताना न्यू योर्क पोलिसांनी त्यांची रवानगी इटालियन ड्रग्सची तस्करी करणारी स्त्री समजून थेट ग्र्यांड केनीयन च्या तळाशी असणाऱ्या तुरुंगात केली. तिकडे एका वृद्ध दांपत्या सोबत त्यांना तुरुंगात रात्र काढावी लागली. अश्या परिस्थितीचाही त्यांनी डगमगून न जाता मोठ्या धैर्याने सामना केला.
एक अभियंता, एक शिक्षिका, एक लेखिका, एक समाजसेविका, एक उद्योजिका, एक सॉफ्टवेअर इंजिनिअर, एक क्लार्क, एक ट्रस्टी, एक गृहिणी, एक आई अश्या दुर्गेच्या सगळ्या रूपांच प्रतिनिधित्व आपल्या आयुष्याच्या भूमिकातून साकारताना प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तुत्वाची छाप सोडत भारतातील आणि जगातील सगळ्याच स्त्रियांनसमोर एक आदर्श निर्माण करून आयुष्यात चांगल काहीतरी करण्याची सतत प्रेरणा देणाऱ्या दुर्गाशक्ती पद्मश्री सुधा मूर्ती ह्यांना माझा साष्टांग नमस्कार.
माहिती स्त्रोत :- गुगल
फोटो स्त्रोत :- गुगल
#दुर्गाशक्ती (भाग ८)

पद्मश्री डॉक्टर इंदिरा हिंदुजा. -विनीत वर्तकमार्च २०१६ ला भारतात एक वर्तुळ पूर्ण झालं. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी हर्षा चावडा हिने जसलोक हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच ज्या लोकांना मुलं नैसर्गिक पद्धतीने होतं नाही अश्या लोकांसाठी वरदान ठरली आहे. स्त्री च बीज आणि पुरूषाचे शुक्राणू घेऊन त्याचं मिलन बाहेर केलं जाते. २-६ दिवस अतिशय नियंत्रित पद्धतीने त्याचं फलन झाल्यावर ते बीज स्त्री च्या युटेरस मध्ये सोडलं जाते. ह्या बीजापासून मग एक नवीन जीव स्त्री च्या उदरात वाढू लागतो. आई – वडील होणाच्या सुखापासून वंचित राहिलेल्या अनेक जोडप्यांना हे सुख देणारी ही पद्धत १९७० ला सर रॉबर्ट एडवर्ड ह्यांनी विकसित केली. पण भारतात ही पद्धत विकसित करण्याच श्रेय डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना दिलं जाते. ६ ऑगस्ट १९८६ ला डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांच्या प्रयत्नातून चावडा दांपत्याने भारतात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी ला जन्म दिला.
डॉक्टर इंदिरा हिंदुजा एका सामान्य कुटुंबातून पुढे आल्या. बेळगाव इथल्या म्युन्सिपल शाळेत त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. ज्या काळात मुलींना शिक्षण द्यायलाच विरोध केला जात होता अश्या काळात डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांनी आपलं शिक्षण सुरु ठेवलं. त्या कठीण काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना डॉक्टर बनण्याचं शिक्षण घे असं निक्षून सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी डॉक्टरकीच शिक्षण पूर्ण केलं. किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई इकडे एक स्त्री रोग तज्ञ म्हणून त्यांनी आपलं कार्य सुरु केलं. आपला प्रवास उलगडताना त्या म्हणतात,
“There were many turns and twirls in (my) life so whenever I could change difficulty into an opportunity, it was an ‘aha’ moment.”
१९८५-८६ च्या काळात मनी चावडा ह्यांना लग्न होऊन ५ वर्ष झाली तरी गर्भधारणा होतं नव्हती. अनेक डॉक्टर आणि औषध करून झाली पण यश येत नव्हतं. त्यांना एका डॉक्टर ने डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना भेटण्याचा सल्ला दिला. सल्लामसलती नंतर डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांनी एक क्रांतिकारी पाउल उचलण्याचा निर्णय घेतला. पण वाटचाल सोप्पी नव्हती. अनेक कायदेशीर प्रक्रियातून डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना जावं लागलं. पण न डगमगता त्यांनी यशस्वीरीत्या भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आजवर तब्बल १५,००० पेक्षा जास्ती टेस्ट ट्यूब बेबी डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांनी आय.व्ही.एफ. ह्या तंत्रज्ञानाने जन्माला आणल्या आहेत. डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्या इकडेच थांबल्या नाहीत त्यांनी भारतात जी.आय.एफ.टी. तंत्रज्ञानाने पाहिलं मुल ४ जानेवारी १९८८ ला जन्माला आणलं तर ओसाईट डोनेशन टेक्निक ने २४ जानेवारी १९९१ ला पाहिलं मुल भारतात जन्माला आलं. भारतात आज प्रत्येक ७-८ जोडीदारांनमागे एका जोडप्याला मुल होण्यास अडचण येत असते. त्या सगळ्यांसाठी ह्या पद्धती वरदान ठरल्या आहेत.
एक काळ होता जेव्हा डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना अनेक अग्निदिव्यातून जावं लागलं. आय.व्ही.एफ. तंत्रज्ञांनासाठी असलेली लोकांची मानसिकता खूप वेगळी होती.
“many people continue to wrongly believe that IVF is a treatment for elderly couples, that complete bed rest is required during this treatment, and that surrogacy may contribute to the genetic makeup of the child.”
पण अश्या परिस्थितीत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करून अनेक जोडप्यांच स्वप्न पूर्ण करताना डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांनी भारतीय स्त्रीच्या कर्तुत्वाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. ह्यासाठी त्यांना २०११ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आजही मुंबईच्या पी.डी.हिंदुजा हॉस्पिटल मध्ये त्या कार्यरत असून अनेक जोडप्यांना आई वडिलांच सुख देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. एका सामान्य कुटुंबातून प्रतिकूल परीस्थितीतून पुढे येतं आपल्या ज्ञानाचा फायदा भारतातील अनेक कुटुंबाना त्यांनी दिला.
भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी हर्षा चावडा हिने ज्यांच्यामुळे आपला जन्म झाला त्या दोन्ही डॉक्टरना आपल्या बाळंतपणासाठी बोलावलं ज्यात डॉक्टर इंदिरा हिंदुजा आणि डॉक्टर कुसुम झवेरी ह्या होत्या. ३० वर्षापूर्वी ह्याच दोन डॉक्टर नी हर्षा ला ह्या जगात आणलं होतं. हर्षा चावडा च्या मते डॉक्टर इंदिरा हिंदुजा माझी दुसरी आई आहे जिने मला ह्या जगात आणलं व आता माझ्या मुलाला ही ह्या जगात तिच्या हाताने आणणं हा तिचा सगळ्यात मोठा गौरव असेल. मार्च २०१६ ला हर्षा चावडा च्या मुलाला जन्म देताना डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांनी भारतात एका क्रांतिकारी पावलांच एक वर्तुळ पूर्ण केलं अस म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. भारतातल्या स्त्रियांना मातृसुख देऊन त्यांच्या आयुष्यात क्रांती आणणाऱ्या दुर्गाशक्ती डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना माझा सलाम.
माहिती स्त्रोत :- गुगल, विकिपीडिया, बेटर इंडिया
फोटो स्त्रोत :- गुगल
#दुर्गाशक्ती (भाग ७)

पद्मश्री सुभासिनी मिस्त्री. -विनीत वर्तककधी कधी कर्तुत्वाची उंचीच इतकी असते की पुरस्काराच वजन त्यामुळे वाढते. काहीसा हाच अनुभव ह्या वर्षीच्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुभासिनी मिस्त्रीन मुळे पद्मश्री पुरस्काराला आला आहे. सुभासिनी मिस्त्री वय वर्ष ७५ जेव्हा अगदी साध्या साडीत आणि साध्या स्लीपर घालून राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार स्वीकारत होत्या तेव्हा पूर्ण भारत काय पूर्ण जग अवाक होऊन बघत होतं. कारण एक स्त्री ठरवलं तर काय करू शकते ह्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभासिनी मिस्त्री.
अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनी च लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुल खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ह्या अकाली मृत्यूला कारण होतं ते म्हणजे वेळेवर न मिळालेले उपचार. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने वेळेवर नवऱ्याला हॉस्पिटल मध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्री नी आपलं आयुष्याच ध्येय निश्चित केलं ते म्हणजे आपण हॉस्पिटल काढायचं. असं हॉस्पिटल जिकडे सगळ्या गरजुंचे उपचार होतील. एकही माणूस उपचार नाही मिळाले म्हणून मृत्युमुखी पडणार नाही. ज्या गावात आपल्या नवऱ्याला मरण आलं तिकडे मी हॉस्पिटल काढेन अस तिने निक्षून सांगितलं. लोकांनी तिचं हसं केलं. एक २३ वर्षाची स्त्री अंगावर ४ मुलं ज्यात सगळ्यात मोठा ८ वर्षाचा तर लहान ४ वर्षाचा, अशिक्षित आणि गरीब. हॉस्पिटल तर सोडाच पण स्वतःच घर नीट करून दाखव अशी लोकांनी तिची अवहेलना केली.
हरेल तर ती भारतीय स्त्री कुठली. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुभासिनी मिस्त्री नी आपल्या लक्षाकडे वाटचाल सुरु केली. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत तिने लोकांच्या घरी काम करायला सुरवात केली. ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची काम करून तिला महिन्याला १०० रुपये मिळायला लागले. आपल्या मुलांना तिने अनाथआश्रमात ठेवलं आणि बाकीच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरु केला. तिने ब्यांकेत आपलं खात सुरु केलं. आपल्या मुलांची शिक्षण आणि खर्च करून जे काही पैसे वाचले ते ती ब्यांकेत टाकत गेली. तब्बल २० वर्ष हे प्रामाणिकपणे करत राहिली.
१९९२ साल उजाडल सुभासिनी मिस्त्री नी हन्सपुकुर ह्या गावात १०,००० रुपयांना जमीन खरेदी केली. हे तेच गाव होतं जिकडे तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. २० वर्षात बरचं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. तिच्या सगळ्यात लहान मुलाने आईच स्वप्न पूर्ण करण्याच निश्चित केलं होतं. त्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोलकत्ता मेडिकल कॉलेज मधून डॉक्टर ची पदवी मिळवली होती. जी लोक २० वर्षापूर्वी तिच्या स्वप्नावर हसली होती त्याच गावातील लोकांना आपण ही जमीन हॉस्पिटलसाठी दान देतं आहोत गावकऱ्यांनी ह्या हॉस्पिटल च्या उभारणीसाठी आपलं योगदान द्यावं अस त्यांनी गावातील लोकांना आवाहन केलं. लोक येत गेले आणि कारवा बनता गया. पुढील २-३ वर्षात ह्युम्यानिटी हॉस्पिटल ने २५० लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही सगळी मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली होती. ज्यात सुभासिनी मिस्त्री ह्यांचा डॉक्टर मुलगा अजय मिस्त्री ह्यांचा समावेश होता.
ह्युम्यानिटी हॉस्पिटल च नाव सगळीकडे पसरलं. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी अनेक लोक आणि संस्था पुढे आल्या. एका वर्षाच्या आत ह्युम्यानिटी हॉस्पिटल ट्रस्टकडे १० पट पैसा जमा झाला जो हॉस्पिटल उभारणीच्या पहिल्या टप्प्यात गरजेचा होता. आज हे हॉस्पिटल पूर्णतः अद्यावत असून ह्यात ऑपरेशन थेटर, सोनोग्राफी, एक्स रे आणि इतर विविध उपकरणांनी सज्ज आहे. ह्या हॉस्पिटल च एक युनिट त्यांनी प्रथारप्रतिमा, सुंदरबन इकडे सुरु केलं. ज्याचा उद्देश प्रत्येक माणसाला वैद्यकीय सेवा देणं हाच आहे.
अशिक्षित, गरीब आणि वयाच्या येन उमेदीच्या काळात ४ मुलांची आई असूनपण समाजातील प्रत्येकाला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील एक एक पैसा वाचून ह्युम्यानिटी हॉस्पिटल च स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरवणं हे शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकं मोठ काम त्यांनी केलं. भारताचा ४ था सगळ्यात मोठा नागरी सन्मान पद्मश्री मिळाल्यावर त्यांचे शब्द होते.
“I am very happy to get the award but I would like to request all hospitals in the world, please don’t refuse a patient who needs immediate medical attention. My husband died because he was refused admission and I don’t want anyone else to die in a similar way.”
पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना सुद्धा अगदी साध्या वेशात आणि स्लीपरवर सुभासिनी मिस्त्री राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर पण गर्वाचा एक लवलेश सुभासिनी मिस्त्री ह्यांच्या बोलण्यात नव्हता. त्यांच्या मते माझ्या कामाचा पुरस्कार मला केव्हाच मिळाला. जेव्हा आमच्या हॉस्पिटल मधून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा मला माझ्या कामाचा पुरस्कार मिळाला.
सुभासिनी मिस्त्री ह्यांना पद्मश्री देऊन सरकारने त्यांचा गौरव नाही केला तर त्या पुरस्काराचा गौरव केला आहे. गरीब, अशिक्षित, उमेदीच्या काळात विधवा होऊन ४ मुलांची कर्तव्य वयाच्या २३ वर्षी असणारी एक स्त्री एक स्वप्न बघते की आपण हॉस्पिटल काढायचं आणि ह्या समाजात एकाही व्यक्तीचा मृत्यू हा वैद्यकीय मदतीशिवाय होता कामा नये. ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी तिने हॉस्पिटल काढण्यासाठी लावून नुसतं हॉस्पिटल काढून न थांबता आपल्या मुलाला डॉक्टर करून समाजाच्या सेवेसाठी रात्रंदिवस वाहून घेतलं. स्त्रीने ठरवलं तर तिला काहीच अशक्य नाही आणि कोणाच्या आधाराशिवाय ती आपली स्वप्न पूर्ण करू शकते हा आत्मविश्वास भारतात आणि जगातील सगळ्याच स्त्रियांना आपल्या विनम्र वागणुकीतून देणाऱ्या दुर्गाशक्ती पद्मश्री सुभासिनी मिस्त्री ह्यांना माझा दंडवत.
माहिती स्त्रोत :- गुगल, टाईम्स ऑफ इंडिया
फोटो स्त्रोत :- गुगल
#दुर्गाशक्ती (भाग ६)

आकाशातून उडी घेणारी मराठमोळी मुलगी पद्मश्री शितल महाजन. -विनीत वर्तक६ जागतिक विक्रम १९ राष्ट्रीय विक्रम आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हे कर्तुत्व आहे पुण्याची असणारी मराठमोळी मुलगी शितल महाजनच. शितल महाजनचा जन्म १९ सप्टेंबर १९८२ ला पुण्यात झाला. मूळचे गाव जळगाव असलेली शीतल ही बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. बहिणाबाई चौधरीचे नातू कमलाकर महाजन यांची सुकन्या. बालपणापासूनच शितलला काहीतरी नवे करण्याचा ध्यास होता. २००३ ला शितल ची ओळख स्कायडायव्हिंग शी झाली. सामान्य नागरिकांसाठी स्कायडायव्हिंग च प्रशिक्षण हे भारतात उपलब्ध नव्हतं. शिक्षण घ्यायचं असेल तर भारताबाहेर जावं लागणार होतं. ज्या कुटुंबाने कधी विमानात पाय ठेवला नव्हता त्या कुटुंबातून एक स्त्री विमानातून उडी मारण्याच प्रशिक्षण घ्यायचा विचार करते हेच मुळी कोणाच्या पचनी पडणार नव्हतं. “आपल्या घरातील मुली असलं काही करत नाहीत” हे वाक्य शितल ला कुटुंबाकडून ऐकायला मिळालं. शितल ने आपल्या आई वडिलांना आणि कुटुंबाला समजावलं की हा खेळ म्हणजे माझी आवड आहे. प्रत्येक मुलाने मोठ व्हावं आपल्या आई वडिलांच नाव मोठ करावं अस प्रत्येक पालकांना वाटत असते. मग त्यात मुलीने का मागे राहवं? हा प्रश्न विचारल्यावर तिच्या आई वडिलांनी तिच्या स्वप्नांच्या पंखाना बळ दिलं.
१८ एप्रिल २००४ ला शितलने इतिहास घडवला. उत्तर ध्रुवावर २४०० फुटावरून जिथे कुठे जमीन नसताना सुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या एका तुकड्यावर उणे ३७ डिग्री सेल्सिअस तापमानात तिने आयुष्यातली पहिली उडी कोणत्याही सरावाशिवाय घेतली अस करणारी जगातली ती पहिली महिला ठरली. १६ डिसेंबर २००६ साली दक्षिण ध्रुवावर एक्सलेरेटेड फ्री फॉल अश्या पद्धतीची आयुष्यातली दुसरी उडी ११,६०० फुटावरून मारली. कोणत्याही सरावाशिवाय जगाच्या दोन्ही ध्रुवावरून पॅराशूट च्या साह्याने उडी घेणारी शितल महाजन ही जगातील पहिली महिला आहे. २५ ऑगस्ट २०१४ ला स्पेन – इम्प्रूआब्रावा ह्या परदेशी भूमीवर ८९ नागरिकांनी एका दिवसात टेन्ड्म काय स्कायडायव्हिंग करून जागतिक विक्रम केला त्याच आयोजन शितल महाजन हिने केलं होतं. २२ फेब्रुवारी २०१७ ला पृथ्वीच्या आशिया, युरोप, अंटार्कटिका, नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका अश्या ७ खंडावर पॅराशूट च्या साह्याने उडी घेणारी पहिली महिला ठरली. ह्यासाठी तिला १० वर्ष २ महिने आणि ६ दिवस लागले. तिने अमेरिकेतून स्कायडायव्हिंग ची ए, बी, सी, डी अशी सगळी प्रमाणपत्र मिळवली आहेत. ज्यामुळे ती जगातील कोणत्याही स्कायडायव्हिंग मध्ये भाग घेऊ शकते. आजवर ७५० पेक्षा जास्त वेळा विमानातून स्कायडायव्हिंग (पॅराशूट च्या साह्याने उडी ) करण्याचा अनुभव तिला आहे.
१२ फेब्रुवारी २०१८ ला शितलने ९ वारी साडी नेसून आकाशातून उडी घेतली आहे ह्याची नोंद जागतिक विक्रम होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु आहे. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना ६८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छ्या शितलने शिकागो इकडे १३,००० फुटावरून आकाशातून स्कायडायव्हिंग करताना दिल्या आहेत. शितल इतक्यावर थांबलेली नाही तर आता येत्या एप्रिल महिन्यात गोल्ड कॉस्ट ऑस्ट्रेलिया इकडे 400 महिलांना स्कायडायव्हिंग आणि स्क्युबा ड्रायविंग करण्याची संधी शितलने दिली आहे.
एकीकडे आपल्या कर्तुत्वाने जग गाजवत असताना आपल्या कौटुंबिक भूमिका पण शितलने तितक्याच जबाबदारीने पूर्ण केल्या आहेत. १८ एप्रिल २००८ मध्ये शितल ने वैभव राणे ला आपला जोडीदार निवडताना आपलं लग्न पण एका अनोख्या पद्धतीने हवेत साजर केलं आहे. पुण्याच्या जवळ हॉट एअर बलून मधून जमिनीपासून ७०० फुटावर हा लग्नसोहळा पार पडला होता. वृषभ आणि वैष्णव अश्या दोन जुळ्या मुलांची आई असूनपण तिने आपलं आकाशातून उडी मारण्याच आणि भारतात अश्या साहसी क्रीडाप्रकाराला प्रसिद्ध करण्याच शिवधनुष्य लिलया पेललं आहे.
एका सामान्य मराठी कुटुंबातून पुढे येत स्कायडायव्हिंग सारख्या साहसी क्रीडाप्रकाराला आपलसं करत त्यात नुसतं नैपुण्य नाही तर एक दोन सोडून तब्बल ६ जागतिक विक्रम आणि १९ राष्ट्रीय विक्रम करत त्या पलीकडे जाऊन एक सामान्य मराठी, भारतीय स्त्री आपलं कुटुंब, घर ह्यासोबत येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून पूर्ण जगात भारत देशाच नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकते हा विश्वास Shital Mahajan ने सगळ्याच भारतीय स्त्रियांना दिला आहे. तेवढ्यावर न थांबता आपल्याला ज्या अडचणीतून जावं लागलं त्यातून दुसऱ्या कोणालाही ज्यांना ह्या क्षेत्रात यायचं आहे त्यांना जावं लागू नये म्हणून स्कायडायव्हिंग सारख्या अतिशय साहसी खेळाच प्रशिक्षण देणाऱ्या फोनिक्स संस्थेची स्थापना करून शितलने एक आदर्श सगळ्याच स्त्रियांपुढे ठेवला आहे. अश्या ह्या दुर्गाशक्तीस माझा नमस्कार आणि पुढल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छ्या.
हा लेख लिहताना खुद्द शितल महाजन ह्यांनी परदेशातून त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून काही सूचना आणि मदत मला केली. त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे.
ता.क.:- २०१८ चा सर्वोत्कृष्ठ लेखक म्हणून कुबेर समूहाचा मला मिळालेला पुरस्कार पद्मश्री शितल महाजन ह्यांच्या उपस्थितीत स्वीकारताना एक वेगळीच उंची त्या पुरस्काराला मिळालेली आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षणांपेकी एक आहे.
माहिती स्त्रोत :- शितल महाजन
फोटो स्त्रोत :- गुगल
दुर्गाशक्ती (भाग ४)

अवकाशाची स्वप्न प्रत्यक्षात जगणारी पहिली मराठी स्त्री अनिमा पाटील-साबळे.आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक स्वप्न बघतो. त्यांचा पाठलाग करतो. पण सगळीच सत्यात येतात असं होतं नाही. आपण थांबतो. वाटते वय झालं, आता वेळ नाही , जमणार नाही, कोणी मदत करत नाही. पण ह्या पलीकडे स्वप्न बघून त्याचा पाठलाग करणारे थोडेच असतात. महाराष्ट्रातल्या जळगाव मधून एका छोट्या शाळेत शिक्षण घेताना ७ वर्षाच्या अनिमा ने अवकाशात भरारी घेण्याची स्वप्न बघितलं. एका पुस्तकांच्या प्रदर्शनात अमेरिका आणि रशिया च्या अवकाशयात्रीचे फोटो असलेलं एक पुस्तक हाताला लागलं आणि अनिमा ने ते बघताच आपल्या आयुष्याच लक्ष्य ठरवलं. त्याच काळात भारताचे राकेश शर्मा रशियन रॉकेट मधून अवकाशात जाऊन आले होते. तेच अनिमा चा आदर्श ठरले. एक दिवस मी पण असाच सूट घालून ह्या अवकाशात विहार करेल अस अनिमा नी नक्की केलं. सगळे नातेवाईक शिकून काय करणार? पुढे जाऊन तर लग्न करून संसार थाटायचा आहे अस बोलत असताना अनिमा ने आपल्या स्वप्नांची साथ सोडली नाही.
अवकाशाला गवसणी घालण्यासाठी गरज होती ती पायलट बनण्याची म्हणून अनिमा ने फायटर पायलट बनण्याचा निश्चय केला. त्याकाळी हे क्षेत्र महिलांना खुले नव्हतं तसेच अजून एक अडचण तिच्यासमोर होती ती म्हणजे स्त्री म्हणून नाही तर तिच्या डोळ्याचं व्हिजन हे २०-२० नव्हतं. अनिमा ची सगळी स्वप्न एका क्षणात तुटली. पुढे काय कराव हे कळत नसतांना, वडिलांनी एम सी ए ला अर्ज करण्याचा सुचवलं पण हे हि सांगितलं कि हा ३ वर्षाचा कोर्स आहे, तुला लग्नासाठी स्थळ येत आहेत. जर एखादा स्थळ पसंत पडला तर तुझी डिग्री पूर्ण होईल याची खात्री नाही. तेव्हा आईने मध्यस्ती केली आणि अनिमा ची साथ देत त्या म्हंटल्या ती हुशार आहे स्मार्ट आहे, करू द्या तिला एम सी ए आपण तिच्या होणाऱ्या सासरच्यांना विनंती करू तिला शिक्षण पूर्ण करु देण्यासाठी. अनिमा नेे मास्टर इन कॉम्प्यूटर एप्लिकेशन मधून आपलं पदवी शिक्षण सुरु केलं, ते करत असतानाच कॉलेज मध्ये तिला एक वर्ष सिनियर असणाऱ्या दिनेश यांनी तिच्यासाठी मागणी घातली. घरच्यांच्या संमतीने अनिमाने आपला जोडीदार म्हणून निवडलं.
लग्नानंतर अनिमा आणि दिनेश मुंबईत येऊन जॉब करू लागले. मुंबई मधून त्यांना अमेरिकेत जायची संधी मिळाली. मार्च २००० मध्ये अनिमा अमेरिकेत आल्यावर आपला सॉफ्टवेअर मधला जॉब करीत असताना अनिमा च्या मनात असलेल स्वप्न तिला शांत झोप लागू देतं नव्हतं. आकाशाला गवसणी घालण्याच जे स्वप्न तिने लहानपणी बघितलं ते कुठेतरी अजूनही सतत तिला अस्वस्थ करतं होतं. आपल्या घराच्या जवळच नासा च एक केंद्र तिला दिसलं आणि पुन्हा तिच्या स्वप्नाला नवीन धुमारे फुटले. आपला जॉब करत अनिमा ने एरोस्पेस इंजिनिअरींग ला प्रवेश घेतला. तेव्हा अनिमा ३ वर्षाच्या एका बाळाची आई झाली होती. कोणालाही हे वाचताना अचंबित होईल की एक ३ वर्षाच्या मुलाची आई कॉलेज ला जात होती. पण सकाळी ४ ला उठून घरातलं सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत अनिमा ने आपलं शिक्षण पुन्हा सुरु केलं. कॉलेज चालू असताना तिने नासा आणि लॉकहिड मार्टिन मध्ये नोकरीसाठी अर्ज देणं सुरु ठेवलं होत. पण अमेरिकन नागरिक नसल्याने तिला तिकडे प्रवेश मिळाला नाही. पण तिने हार मानली नाही. तिच्या शब्दात
It is okay to go slow but giving up is never an option if you want to fulfill your dreams.
तिचं मास्टर होईपर्यंत अनिमा दुसऱ्या बाळाची आई झाली होती. एक आई, बायको, नोकरी करणारी स्त्री आणि एक विद्यार्थी अश्या सगळ्या भूमिकेतून वावरताना तिने आपलं शिक्षण चांगल्या मार्काने पूर्ण केलं. २०१० मध्ये तिचं शिक्षण संपल आणि तिने नासा मध्ये काम करण्यासाठी पुन्हा अर्ज करण सुरु केलं. तिच्या प्रयत्नांना २०१२ मध्ये यश आलं जेव्हा नासा मधून केपलर मिशन साठी प्रिंसिपल इंजिनिअर म्हणून तिची निवड झाली. त्यावेळेस अनिमा अमेरीकेच नागरिकत्व ही मिळालं. अनिमा ने ह्या जॉब सोबत नासा आणि केपलर मिशन बद्दल माहिती सांगायला सुरवात केली. थोड्याच दिवसात अनिमा तिथल्या मुलींसाठी रोल मॉडेल ठरली. अनिमा ची निवड नासा च्या दोन एनेलॉग मिशनसाठी कमांडर म्हणून निवड झाली. चंद्र, मंगळ किंवा इतर कोणत्या ग्रहावर अंतराळवीर कसे राहतील? त्यांना कोणत्या अडचणी येतील ह्याच्या अभ्यासासाठी झालेल्या मिशन मध्ये त्यांची निवड झाली होती.
NASA’s Human Exploration and Research Analog in 2015 and a Martian analog at the Mars Desert Research Station in 2018.
अश्या प्रकारच्या मोहिमेत समावेश होणे हे अंतराळवीर बनण्याच्या दृष्टीने पहिली पायरी मानली जाते. अनिमा ने नासा मध्ये काम करताना अगदी ६ जी पर्यंतच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला आहे. जो अंतराळवीर बनणाऱ्या लोकांसाठी गरजेच मानलं जाते. त्या प्रभावात काम अचूकपणे करता येण्यासाठी शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागत असतो. ह्या सर्वात अनिमा उत्तीर्ण झाली आहे. आपलं लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणाच्या दृष्टीने तिने अजून एक पाउल पुढे टाकलेलं आहे.
अनिमा अंतराळात जेव्हा भरारी घेईल तेव्हा ती अंतराळात जाणारी जगातील पहिली मराठी स्त्री असेल. जळगाव सारख्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबातून असलेल्या अनिमा ने वयाच्या सातव्या वर्षी बघितलेल्या एका स्वप्नाचा पाठलाग सुरु ठेवला. घरच्यांचा विरोध पत्करून आपल्या आईच्या मदतीमुळे अनिमा ने आपलं शिक्षण पूर्ण केलं. नुसतचं पूर्ण केलं नाही तर ते पूर्ण झाल्यावर एक सामान्य कौटुंबिक आयुष्य जगताना पण त्या स्वप्नाची कास तिने सोडली नाही. वय झालं, वेळ निघून गेली असा विचार न करता आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे शक्य होईल ते अगदी प्रतिकूल परिस्थितीत ती करत गेली. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आपलं स्वप्न ही आपण जगू शकतो जे अनिमा ने भारतातील सगळ्याच स्त्रियांना आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिलं आहे. जेव्हा गोष्टी आपल्याला मनापासून कंरायच्या असतात तेव्हा काही अशक्य नाही हे अनिमा ने सिद्ध केलं. भारतातील एका छोट्या शहरातून एका मराठमोळ्या सामान्य कुटुंबातून पुढे येतं आपल्या स्वप्नांचा पाठलाग जगातील अवकाश संशोधनात सर्वोच्च असणाऱ्या संस्थेत जिकडे काम करण हेच मुळी एक स्वप्न असते तिथे काम करून वयाच्या चाळीशीत आणि दोन मुलांची आई असूनपण आकाशात जाण्याची स्वप्न प्रत्यक्षात जगणाऱ्या दुर्गाशक्ती अनिमा पाटील- साबळे ह्यांना माझा दंडवत.
ता. क. :- हा लेख लिहताना खुद्द अनिमा पाटील- साबळे ह्यांनी अमेरिकेवरून व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून काही सूचना आणि मदत मला केली. त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे.
माहिती स्त्रोत :- Anima Patil-Sabale
फोटो स्त्रोत:- गुगल
दुर्गाशक्ती (भाग २)

आय.ए.एस. ऑफिसर श्वेता अग्रवाल.१९८० च दशक होतं. भारतात अजूनही आधुनिकीकरणाचे वारे पोहचले नव्हते. मुलीच अस्तित्व अजूनही चूल आणि मुल ह्यापुरती मर्यादित होतं. अश्याच एका २८ जणांच्या एकत्रित कुटुंबात श्वेता अग्रवाल चा जन्म भाद्रेश्वर, पश्चिम बंगाल इकडे झाला. जुन्या पिढीतील श्वेताच्या आजी आजोबांची अशी धारणा होती की “घराच नाव हा मुलगाच काढू शकतो. आपला वंश पुढे नेण्याच काम हा फक्त मुलगा करू शकतो. आपल्या घराचा व्यवसाय पुढल्या पिढीत फक्त आणि फक्त मुलगाच नेण्यास सक्षम आहे”. त्यासाठी श्वेता च्या आई वडिलांवर मुलगा होण्यासाठी खूप दबाव टाकला जात होता. त्यामुळे जेव्हा श्वेता चा जन्म झाला तेव्हा कोणीच आनंदी झालं नाही. उलट श्वेता ला जन्म देणाच्या आई वडिलांच्या निर्णयामुळे त्यांना त्या एकत्र कुटुंबात अनेक पद्धतीने दूषणं ऐकावी लागत होती.
श्वेताचे वडील बारावी तर आई दहावी पर्यंत शिकलेली होती. कमी वयात लग्न करणाच्या पद्धतीमुळे आईचं शिक्षण सोडून लग्न लावून देण्यात आलं होतं. जे आपलं झालं ते आपल्या मुलीचं होऊ नये म्हणून लहानपणापासून तिच्या आई वडिलांनी आपल्या मुलीला शिकवायचं ठरवलं. आपल्या १५ भावंडात श्वेता सगळ्यात लहान होती. पुढे जाऊन आपल्या कुटुंबातील पदवी शिक्षण घेणारी ती पहिली मुलगी ठरली. श्वेताच्या बहिणींची लग्न वयात येताच लावली गेली. पण आपल्या मुलीला शिक्षण द्यायचा बांधलेला चंग तिच्या आई वडिलांनी सोडला नाही. श्वेताच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. त्याकाळी शाळेची महिन्याची फी १६५ रुपये भरण्याची पण श्वेता च्या आई वडिलांना कठीण जात होतं. श्वेता चे वडील रोजणदारी वर काम करत होते. त्याशिवाय किराणा दुकानातून उत्पन ही बेताच होतं. श्वेताचे वडील अनेकदा तिच्या आईला म्हणत की, “आपण रोज १० रुपये वाचवले तरी तिचं शिक्षण करू शकु”. श्वेता ही नातेवाईकांनकडे गेल्यावर त्यांनी दिलेले अगदी ५ रुपये सुद्धा जपून ठेवत असे. त्यातून शाळेची फी भरण्याचा आपला खारीचा वाटा उचलत असे.
श्वेता ला कळून चुकलं होतं की आपल्या आई वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीच फळ आपण अभ्यास करूनच परतफेड करू शकतो. कॉलेज ला जायला लागल्यावर तिच्या काकांनी तिच्या पुढल्या शिक्षणाला विरोध केला. मुलगी कॉलेज करून काय करणार आहे? श्वेता ने तिच्या आई वडिलांना निक्षून सांगितल की आपल्या घराण्यातून पदवी शिक्षण घेणारी मी पहिली मुलगी बनेल. तिचे हे शब्द तिने खरे करून दाखवले. पण श्वेता तिथेच थांबली नाही. सरकारी कार्यालयातील ढिसाळ कामाचा एकदा अनुभव आल्यावर मी ह्या ऑफिस ची ऑफिसर बनवून दाखवेन हे बोल तिने तिथे असलेल्या अधिकाऱ्याला बोलून दाखवले होते. त्यासाठी तिने मिळालेला जॉब सोडला. जॉब सोडताना तिच्या बॉसने तिला सांगितल की “ज्या परीक्षेला ५ लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातून फक्त ९० लोकं निवडली जातात. त्यासाठी आपलं पूर्ण करियर तू धोक्यात घालते आहेस अस वाटत नाही का तुला? त्यावर श्वेता ने एक सेकंद वेळ न दवडता उत्तर दिल होतं. “त्या ९० मध्ये मी एक असेन”.
२०१३ ला श्वेता ने पूर्ण मेहनत करत यु.पी.एस.सी. ची परीक्षा दिली. त्यात तिचं रँकिंग होतं AIR 497. तिचं आय.पी.एस. व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. पण तिला आय.आर.एस. बनता येणार होतं. ह्या नंतर घरून लग्ना बद्दल बोलणी सुरु झाली. पण श्वेता च्या मनात तीच स्वप्न स्वस्थ बसून देतं नव्हतं. लग्न काय ३२ वर्षानंतर पण होईल पण ३२ वर्षानंतर मी यु.पी.एस.सी. देऊ शकणार नाही हे तिने आपल्या आई वडिलांना निक्षून सांगितलं. पुन्हा एकदा २०१५ ला तिने परीक्षा दिली. अवघ्या १० मार्कांनी तीच स्वप्न भंगलं. तिचं रँकिंग होतं AIR 141. आता ती आय.पी.एस. साठी पात्र ठरली होती. पण अजूनही तीच स्वप्न अपूर्ण होतं. पुन्हा एकदा त्यासाठी तिने २०१६ ला परीक्षा दिली. आय.पी.एस. च तीच ट्रेनिंग सुरु असताना एक दिवस तिचा फोन वाजला. समोरून सांगितल श्वेता AIR 19. हे ऐकताच श्वेता च्या आनंदाला पारावार राहिला नाही. श्वेता पश्चिम बंगाल राज्यातून पहिली आणि पहिल्या २० नंबर मध्ये तब्बल दशकानंतर कोणीतरी पश्चिम बंगाल मधून मजल मारली होती. हा आनंदाचा क्षण इतके वर्ष तिच्या आई वडील आणि तिने पाहिलेल्या स्वप्नपुर्तिचा क्षण होता.
अभ्यास करताना श्वेताने दोन वाक्य आपल्या अभ्यासाच्या टेबलवर मोठ्या अक्षरात लिहून ठेवली होती. ती होती,
The Alchemist, “When you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”
Eleanor Roosevelt’s words, “The future belongs to those who believe in the beauty of their dreams.”
श्वेता ने ही वाक्य लक्षात ठेवून आपलं ध्येय मिळवलं होतं. ज्या कुटुंबात मुलगी झाली म्हणून तिच्या आई वडिलांना हिणवलं गेलं. मुलगाच आपल्या कुटुंबाच नाव मोठ करतो हा समज तिने आपल्या कर्तुत्वाने खोडून काढला आणि आपल्या कुटुंबाच्या आणि एकूणच भारतीय स्त्रियांबद्दल असलेला गैरसमज दूर केला. प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि मनापासून इच्छा असेल तर स्काय इज द लिमिट हे तिने भारतीय स्त्रियांना दाखवून दिलं. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर
“They had nourished and nurtured my dream just as strongly. It was a fruit of their hard work too. From now on, no one would ever walk up to my parents, especially my mother and say, ‘Aapne beta nahi kia?’ (Why didn’t you plan a son?) To aspirants, I say, dream big. Don’t forget to back your dreams with hard work and determination.”
अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून आपलं शिक्षण पूर्ण करून स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आणि ती आपल्यासोबत आपल्या कुटुंबाच नाव पण वर नेऊ शते हे श्वेता ने आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिलं आहे. अश्या ह्या दुर्गेस माझा नमस्कार आणि पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छ्या.
माहिती स्त्रोत :- गुगल, बेटर इंडिया
फोटो स्त्रोत :- बेटर इंडिया
#दुर्गाशक्ती (भाग ५)

भारतीय सैन्यातील पहिली स्त्री सैन्य अधिकारी प्रिया झिंगन. -विनीत वर्तक


भारतीय सेना हे नाव उच्चारताच प्रत्येकाच्या अंगातल रक्त सळसळते. भारतीय सेनेचा गणवेश अंगावर असणं हे प्रत्येकाच स्वप्न असते. हे स्वप्न बाळगणारी प्रिया झिंगन पण होती. लहानपणापासून भारतीय सेनेचा गणवेश अंगावर घालण्याच प्रियाने ठरवलं होतं. भल्या मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे न जाता देशासाठी काहीतरी करण्याच प्रियाने लहानपणीच ठरवलं होतं. एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असणारी प्रिया लहानपणापासून हेच मानत आली होती की पुरुषांपेक्षा स्त्रिया कुठेच कमी नाहीत. जी कामे पुरुष करू शकतात ती सगळीच स्त्रिया करू शकतात.
देशासाठी काहीतरी करून दाखवण्याच स्वप्न प्रियाला स्वस्थ बसू देत नव्हतं. तो हिरव्या रंगाचा गणवेश तिला खुणावत होता. पण भारतीय सेनेत त्या वेळेला स्त्रियांना प्रवेश नव्हता हे प्रियाला पचनी पडत नव्हतं. तिने थेट भारतीय सेनेचे तत्कालीन प्रमुख सुनिथ फ्रांसिस रॉड्रीक्स ह्यांना सरळ पत्र लिहून स्त्रियांसाठी भारतीय सेनेचे दरवाजे उघडण्यासाठी विनंती केली. भारतीय सेनेचा गणवेश अंगावर घालण हे माझ्यासाठी गर्वाचा क्षण आहे. तो अनुभवण्याची संधी एक भारतीय नागरिक म्हणून मला मिळायला हवी असं तिने पत्रात लिहिलं होतं. प्रियाच्या त्या पत्राला तत्कालीन भारतीय सेनेच्या प्रमुखांनी उत्तर देताना पुढल्या दोन वर्षात स्त्रियांना भारतीय सेनेत दाखल होण्याचे दरवाजे उघडले जातील अशी ग्वाही दिली. एका सामान्य स्त्रीने लिहिलेल्या पत्राला भारतीय सेनेच्या प्रमुखाने उत्तर देणं हे प्रियासाठी मोठा गर्वाचा क्षण होता.
आपल्या शब्दाला जागताना १९९२ साली भारतीय सेनेने स्त्रियांना भारतीय सेनेत समाविष्ट होण्यासाठी एक जाहिरात पेपरात दिली. ती जाहिरात म्हणजे प्रियाने आपल्या लहानपणीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात गवसणी घालणाच्या दृष्टीने आलेली एक नामी संधी होती. प्रियाने एकही क्षण न दवडता ह्यासाठी फॉर्म भरला. तोवर प्रियाने कायद्यातून पदवी च शिक्षण घेतलं होतं. भारतीय सेनेत ऑफिसर म्हणून रुजू होण्यासाठी लागणारी सारी दिव्य पेलताना प्रियाने भारतीय सेनेतील प्रवेश नक्की केला. पण हे सोप्पं नव्हतं. ऑफिसर ट्रेनिंग एकेडमी, चेन्नई इकडे प्रिया आणि त्यासोबत २५ मुलींच्या पहिल्या ब्याच च ट्रेनिंग सुरु झालं. प्रिया ला भारतीय सेनेच्या ट्रेनिंग मध्ये घेताना क्याडेट ००१ असा क्रमांक दिला गेला. ह्या क्रमांकाने पुरुषांसाठी मर्यादित असणाऱ्या एका क्षेत्रात स्त्रीने आपला प्रवेश नक्की केला होता. भारतीय सेनेचा हिरव्या रंगाचा गणवेश परिधान करण हे एकच स्वप्न जगलेल्या प्रियाने आपल्या स्वप्नाला पादाक्रांत करणाच्या दृष्टीने प्रवासाला सुरवात तर केली होती.
प्रवासाची सुरवात आणि प्रवास ह्यात जमीन आस्मानीच अंतर असते हे प्रिया सोबत असलेल्या सगळ्याच स्त्रियांना दिसून आलं. भारतीय सेनेच प्रशिक्षण हे जगातील सर्वोत्तम अस मानलं जाते. अतिशय कडक आणि शारीरिक, मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार हे प्रशिक्षण म्हणजे ह्या सगळ्यांसाठी एक कसोटी होती. भारतीय सेनेने स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता ज्या प्रकारच प्रशिक्षण आणि अग्निदिव्यातून पुरुष अधिकाऱ्यांना जावे लागते त्याच परीस्थितीतून स्त्रियांना प्रशिक्षण दिल गेलं. तुम्ही स्त्री आहेत का पुरुष ह्या पेक्षा तुम्ही एक सैन्य अधिकारी असणार आहात हाच विचार सगळ्यात आधी केला गेला. ह्या पूर्ण प्रवासात प्रिया आणि तिच्या सहकारी स्त्रियांना अनेक कठीण प्रसंगातून जावं लागलं. पण ह्या सगळ्यांना पुरून उरत ६ मार्च १९९३ ला प्रियाला भारतीय सेनेतील एक अधिकारी म्हणून पोस्टिंग मिळालं. त्यानंतर तब्बल १० वर्ष भारतीय सेनेत ऑफिसर म्हणून काम करताना प्रिया प्रत्येक क्षण लहानपणी पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे जगली. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर
“It’s a dream I have lived every day for the last ten years.”
२००२ मध्ये प्रिया भारतीय सेनेतून “मेजर” ह्या पदावरून निवृत्त झाली. प्रिया जरी निवृत्त झाली तरी आपल्यामागे प्रियाने एक कारवा जोडला जो आजतागायत वाढत जातो आहे. एक स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे दाखवताना प्रियाने भारतीय सेनेच्या प्रमुखांना लिहिलेलं पत्रच आज स्त्रियांना भारतीय सेनेचे दरवाजे उघडू शकलं. ह्याच वर्षी जून मध्ये भारतीय सेनेचे प्रमुख बिपीन रावत ह्यांनी घोषणा केली आहे की आता स्त्रिया भारतीय सेनेत प्रमुख भूमिकेत म्हणजेच कॉमब्याट ( लढाईत ) मध्ये भाग घेऊ शकणार आहेत. लढवय्या स्त्रिया असा एक ग्रुप भारतीय सेनेत असेल व शत्रूशी समोरासमोर दोन हात करण्यात सक्षम असेल. आज पुरुषांसाठी मर्यादित असणाऱ्या आणि वर्चस्व मानल्या गेलेल्या क्षेत्रात देशासाठी काहीतरी करण्याची आणि भारतीय सेनेचा तो गणवेश अंगावर घालण्याची अनेक स्त्रियांची स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना ह्याची पहिली मानकरी होण्याचा आणि आपल्या स्वप्नांना मनापासून जगून “हम भी कुछ कम नही” हा आत्मविश्वास प्रत्येक भारतीय स्त्री ला देणाऱ्या दुर्गाशक्ती प्रिया झिंगन ह्यांना माझा मनापासून सलाम.
माहिती स्त्रोत :- गुगल
फोटो स्त्रोत :- गुगल
#दुर्गाशक्ती (भाग ३)

भारतातील पहिली महिला रीक्क्षा चालक शिला डावरे.१८ व्या वर्षी १९८० च्या दशकात महाराष्ट्रातील परभणी येथे राहणारी एक तरुणी घरदार सोडून काहीतरी करणाच्या इच्छेने पुणे इकडे येते. हातात असलेले १२ रुपये आणि खूप सारी स्वप्न. थोड शिक्षण झालं की कधी एकदा लग्न करून मुलीला सासरी पाठवतो असा विचार करणारे अनेक पालक असतात. अस गुलामगिरीच जिवन नको म्हणून सगळ्यांना सोडून त्या काळात एका गरीब घरातील मुलीने स्वप्न बघितलं. हे अस स्वप्न बघणे हा त्या काळात गुन्हा असताना ते बघून लग्नाला आपल्या स्वप्नांच्या मध्ये न येऊ देता आपल्या पायावर उभं राहण्यासाठी पुरुषांनी व्यापलेल्या क्षेत्रात पाउल ठेवण्याच धाडस शिला डावरे ने केलं. हे पाउल तिला लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेऊन जाईल ह्याची सुतराम कल्पना शिला ला नव्हती.
१९८८ चा तो काळ होता. पुण्याच्या रस्त्यावर खाकी वर्दीतले रीक्क्षा ड्राईव्हर सगळीकडे दिसत असताना सलवार कमीज घातलेली एक तरुणी त्या गर्दीतून रीक्क्षा चालवते हे दृश्य पुणेकरांना अचंबित करणार होतं. एक स्त्री रीक्क्षा चालवते ही कल्पना मुळी कोणाच्या गळी उतरत नव्हती. शिलाला तिच्या घरातून पण विरोध झाला पण शिला आपल्या ठरवलेल्या मार्गावर चालत राहिली. पण हे सगळ सोप्प नव्हतं. घरातल्या व्यक्तींना समजवू शकतो पण बाहेरच्यांना कसं समजावणार? पाय घासून बाईक थांबवणाऱ्या अनेक स्त्रियांची दृश्य पुणेकरांना सवयीची असल्याने एका स्त्री च्या रिक्षात बसायला अनेकजण तयार नव्हते. कारण एकच होतं की आम्ही सुखरूप ठरलेल्या ठिकाणी पोहचू की नाही? अनेक नाकारांचा सामना करण्याची सवय शिलाला झाली होती.
शिलाने धीर सोडला नाही. जेव्हा नेहमीचे रिक्षावाले सुट्टी घ्यायचे तेव्हा शिलाने रीक्क्षा चालवायला सुरवात केली. हळूहळू लोकांच्या मनातील भीती कमी झाली. अनेक लोकांनी तिच्या ह्या धाडसाच कौतुक केलं. ती रीक्क्षा चालवत असताना अनेकजण थांबून कुतुहलाने तिच्याकडे बघत बसतं. तिच्या ह्या धडसामागे तिला आधार देणारे पुण्यातील काही रिक्षाचालक होते. एकदा एका हवालदाराशी शाब्दिक वादाच रुपांतर शिलावर हात उचलण्यात झालं. त्याच्या ह्या भ्याड हल्याच प्रतिउत्तर शिलाने त्याच्या कानशिलात लगावून दिल. त्याहीपुढे जाऊन त्याच्या मुजोरी ला आळा घालण्यासाठी तिने आपल्या रिक्षाचालक संघटनेची मदत घेऊन त्याला चांगला इंगा दाखवला. एक स्त्री म्हणून मागे न हटता आपल्या हक्कासाठी तिने योग्य तो लढा दिला.
१९८८ ते २००१ अशी सतत १३ वर्ष शिला रीक्क्षा, शाळेची बस, छोटा टेम्पो हे सगळं चालवून आपल्या पायावर उभी होती. वैद्यकीय कारणांमुळे शिलाला ड्राईव्हिंग सोडावं लागलं. पण शिला तिकडेच थांबली नाही. तिने अनेक स्त्रियांना ड्राईव्हिंग साठी उद्युक्त केलं. एका स्त्री ला दुसऱ्या स्त्री चा आधार जास्ती वाटतो. रात्री, अपरात्री एकटीने प्रवास करताना एक स्त्री चालक असणं त्या प्रवास करणाऱ्या स्त्री ला आश्वस्त करते हे तिने अनेकांच्या मनात रुजवलं. शिलाने आपल्या नवऱ्यासोबत एक प्रवासी कंपनी ची स्थापना केली. ह्या सगळ्या काळात तिच्या पतीने तिला योग्य ती तोलामोलाची साथ दिली.
एक सामान्य स्त्री आपल्या पायावर उभं राहण्यासाठी अश्या एका क्षेत्रात प्रवेश करते ज्याचा विचार कधी कोणी केला नव्हता. नुसती प्रवेश करत नाही तर आपल्या पायावर उभं राहून इतर स्त्रियांना त्यातून मार्गदर्शन आणि मदत करते जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील. अनेक अडचणी, अपमान आणि तिच्या कौशल्यावर संशय घेणारे ह्यांना पुरून उरत एक यशस्वी करियर घडवते. वैद्यकीय कारणामुळे लवकर निवृत्ती घेऊनसुद्धा आपल्या पुढल्या पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रीक्क्षा चालवण्याच प्रशिक्षण अकादमी काढण्याचा मानस व्यक्त करते अश्या भारतातील पहिल्या रीक्क्षा चालिकेचा बहुमान मिळवणाऱ्या दुर्गाशक्ती शिला डावरे ह्यांना माझा कुर्निसात.
माहिती स्त्रोत :- गुगल, बेटर इंडिया
फोटो स्त्रोत :- गुगल
दुर्गाशक्ती (भाग १)

भारताची अग्निपुत्री टेसी थॉमस.केरळ राज्याच्या अलापुर्र्हा ह्या गावात १९६३ ला डॉक्टर टेसी थॉमस ह्यांचा जन्म झाला. लहानपणापासून गणित आणि भौतिकशास्त्र ची आवड असणाऱ्या डॉक्टर टेसी थॉमस ह्यांच्या मनात रॉकेट विषयी जिज्ञासा जागृत केली ती जवळच असणाऱ्या थुंबा रॉकेट स्टेशनमुळे. रॉकेट कसं बनते? ते उडते कसं? ह्या सगळ्या प्रश्नांनी त्या बालमनात अनेक कुतूहल निर्माण केली होती. आई ने आपल्या बाळाचे पाय पाळण्यात ओळखले तसेच टेसीच्या ह्या आवडीला आईने प्रोत्साहन दिलं. त्रिसूर कॉलेज इकडून अभियांत्रिकी ची पदवी घेतल्यावर डॉक्ट र्टेसी थॉमस ह्यांनी आपल्या लहानपणी पडलेल्या प्रश्नांचा वेध घ्यायला सुरवात केली. त्याची उत्तर शोधताना निर्माण झालेली ओढ त्यांना पुण्याला घेऊन आली. पुण्याच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडवांस टेक्नोलॉजी मधून गाईडेड मिसाईल टेक्नोलॉजी मध्ये मास्टर पूर्ण केलं तसच एम.बी.ए. ऑपरेशन म्यानेजमेंट आणि मिसाईल गाईड्न्स मधून डॉक्टरेट मिळवली. अश्या वेगळ्या क्षेत्रात चमकताना एक संधी त्यांच्यापुढे आली.
१९८८ ला डी.आर.डी.ओ. ला मुलखत दिल्यानंतर नंतर त्यांना ताबडतोब रुजू होण्याचा आदेश मिळाला. आपले आदर्श डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ज्यांना भारताचे “मिसाईल कार्यक्रमाचे जनक” अस म्हंटल जाते. त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. प्रचंड अभ्यासू आणि अथक परिश्रमातून त्यांनी लवकरच सगळ्याचं लक्ष वेधलं. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी अग्नी क्षेपणास्त्राची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकली. एका स्त्रीकडे भारताच्या क्षेपणास्त्राची धुरा देताना डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी डॉक्ट टेसी थॉमस ह्यांच्यामधील सुप्त गुण ओळखले होते. ३००० किमी पल्ला असणाऱ्या अग्नी ३ ह्या प्रोजेक्ट च्या त्या असोसियेट डायरेक्टर त्या होत्या. तर अग्नी ५ ह्या भारताच्या ५००० की.मी. पेक्षा जास्त पल्ला असणाऱ्या क्षेपणास्त्राच्या त्या प्रोजेक्ट डायरेक्टर बनल्या.
सॉलीड प्रोपेलंट मध्ये प्राविण्य असणाऱ्या डॉक्टर टेसी थॉमस ह्यांनी अग्नी ५ च्या निर्मितीमध्ये निर्णायक भूमिका निभावली होती. अग्नी ५ हे क्षेपणास्त्र अतिशय वेगाने आपल्या लक्ष्याकडे झेपावताना वातावरणाच्या वरच्या टप्यात जाऊन पुन्हा एकदा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. ते करत असताना अतिशय वेग आणि पृथ्वीच्या वातावरणाशी होणार घर्षण ह्यामुळे तपमान हे ३००० डिग्री सेल्सिअस इतकं जात असताना क्षेपणास्त्र मधील सगळ्या प्रणाली व्यवस्थित सक्षम ठेवणारी यंत्रणा निर्माण करण्यात डॉक्टर स्टेसी थॉमस ह्याचं योगदान खूप मोठ आहे. अग्नी ५ च्या यशस्वी चाचणी नंतर आनंदाचा वर्षाव सगळीकडून होत असताना डॉक्टर टेसी थॉमस ह्यांनी पराभवाची आणि अपयशाची चव ही अनेकदा चाखलेली आहे. २००६ मध्ये अग्नी क्षेपणास्त्र आपल्या ठरलेल्या क्षमतेत पराभूत झालेलं असताना अनेक टीका अनेक क्षेत्रातून झाल्या. भारत अश्या क्षेपणास्त्रची निर्मिती स्वबळावर करू शकत नाही तसेच एकूण सर्वच वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांवर शंका उपस्थित केल्या गेल्या. अश्या वेळी डॉक्टर टेसी थॉमस ह्यांनी हार न मानता झालेल्या चुकांतून शिकून अग्नी क्षेपणास्त्र यशस्वी करण्याचा विडा त्यांनी उचलला. तब्बल १२-१६ तास आणि आठवड्याच्या शेवटी सुद्धा सुट्टी न घेता अग्नी ला यशस्वी करण्यासाठी त्यांनी मेहनत केली. अग्नी ५ च्या यशस्वी चाचणी नंतर भारत आंतरखंडीय क्षेपणास्त्र बनवू शकतो ह्यावर जगाने शिक्कामोर्तब केलं. त्यामागे डॉक्टर टेसी थॉमस आणि त्यांच्या टीम चे कित्येक वर्षाचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत.
डिफेन्स वैज्ञानिक ते एक गृहिणी, बायको आणि आई अश्या सर्व भूमिकांतून जाताना अनेकदा नक्की कोणाला महत्व द्यावं अशी कसरत डॉक्टर टेसी थॉमस ह्यांना अनेकदा करावी लागली. आपला मुलगा तेजस प्रचंड आजारी असून सुद्धा अग्नी क्षेपणास्त्र ची चाचणी ला त्यांनी जास्त महत्व देताना आपली उपस्थिती तिकडे नोंदवली. २००८ ला इंडिअन वुमन सायंटिस्ट असोसिएशन नी त्यांच्या बद्दल काढलेले गौरवोद्गार बरच काही सांगून जातात.
“We feel Tessy Thomas serves as a role model and an inspiration for women scientists to achieve their dreams and have their feet planted in both worlds successfully”
ह्या वर्षी डॉक्टर टेसी थॉमस ह्यांची नियुक्ती डायरेक्टर जनरल एरोनॉटीकल सिस्टीम डी.आर.डी.ओ. ह्या ठिकाणी झाली आहे. तसेच त्या अनेक प्रतिष्ठित विद्यापीठाच्या फेलो आहेत ज्यात आय.एन.ए.ई., आय.ई.आय, टी.ए.एस. सारख्या संस्थांचा समावेश आहे. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ज्यात लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार २०१२, सर एम. विश्वेस्वरय्या पुरस्कार २०१६, तसेच डी.आर.डी.ओ. पर्फोर्मंस एक्सलंस पुरस्कार २०११, २०१२ ह्यांचा समावेश आहे. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारताची मिसाईल वुमन ( अग्निपुत्री ) अस बोलवण्यात येतं. ज्या क्षेत्रात पुरूषांच वर्चस्व राहिलेलं आहे. त्या क्षेत्रात शिरून पुरुषांच्या बरोबरीने भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमला आकार देणाऱ्या डॉक्टर टेसी थॉमस ह्या खरे तर भारतीय स्त्रीयांचा आदर्श असायला हव्यात पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. निती आयोगाच्या बैठीकीमध्ये महिंद्रा ग्रुप चे चेअरमन आनंद महिंद्र ह्यांनी एक मार्मिक टिपण्णी डॉक्टर टेसी थॉमस ह्यांच्यावर केली होती.
“Tessy deserves to be more famous than the biggest Bollywood star. A poster of Tessy in every Indian school will wreck stereotypes and create enormous career aspirations for girls”.
डॉक्टर टेसी थॉमस ह्या नेहमीच आपल्या यशाच श्रेय त्यांच्या आईला देतात. लहानपणी पडलेल्या प्रश्नांना शोधण्यासाठी आईने मला संपूर्ण मोकळीक दिली. जेव्हा सर्व जग कॉम्प्यूटर च्या मागे धावत होत तेव्हा मी कुठेतरी एका वेगळ्या क्षेत्रात धडपडत होती. आपली आवड जोपासताना डॉक्टर टेसी थॉमस ह्यांनी स्त्री शक्ती च एक वेगळ उदाहरण आज भारतातील समस्त स्त्रियांपुढे ठेवलं आहे.
आज भारतातील स्त्री ला त्या दुर्गे सारखच कोणतही क्षेत्र वर्ज्य नाही. अडचणी, प्रतिकूल परिस्थिती सगळीकडे असते पण जो ह्यातून आपला प्रवास सुरु ठेवतो त्याला यश मिळतेच. भारताला क्षेपणास्त्र निर्मितीत स्वयंपूर्ण करणाऱ्या ह्या दुर्गेस माझा आजच्या दिवशी नमस्कार आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छ्या.
माहिती स्त्रोत :- गुगल, बेटर इंडिया, विकिपीडिया
फोटो स्त्रोत :- गुगल, बेटर इंडिया
Back to content