Ramnavami - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content
कोल्हापूर आणि पंचक्रोशी मध्ये श्रीरामाची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकीच एक पुरातन आणि प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई च्या देवळात ईशान्य दिशेला असलेले श्री राम मंदिर.

या मंदिराची मालकी करवीर छत्रपतींच्या कडे असून यांच्यातर्फेच मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते. पूर्वी हे मंदिर दुमजली होतं आणि त्याच्या वरच्या मजल्यावर वेदपाठशाळा होती.

या मंदिराला लागूनच असलेला मोठ्या पिंपळाच्या झाडाचा पार हा रामाचा पार म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या काळी अनेक प्रसिद्ध प्रवचनकारांची इथे प्रवचने होत असत. रामाचा पार हे वैदिक कार्य करणाऱ्या ब्राह्मणांचं एकत्र बसण्याचं ठिकाण होतं. ईथं वैदिक ज्ञानाबद्दल धर्मचर्चा होत असत. त्या चर्चांमधून कोल्हापुरात कितीतरी विद्वान ब्राह्मण तयार झाले. या सगळ्याचा साक्षीदार म्हणजे रामाचा पार.

सौजन्य : सौरभ मुजुमदार, संपर्क - ९११२७७८१५३.
संकलन : उमाकांत राणिंगा, संपर्क - ९८९०१४४६१०.
गगनबावडा जहागिरीचा अभूतपूर्व रामनवमी सोहळा

सौरभ मजुमदार/ कोल्हापूर

ज्यांनी मोठ्या संकटातून स्वराज्याला आपल्या शौर्याने ,पराक्रमाने, मुत्सद्देगिरीने ,सांभाळले व त्याचे रक्षण केले ते म्हणजे समस्त राज्यकार्यधुरंदर विश्वासनिधी श्रीमंत हुकूमत पनाह रामचंद्रपंत अमात्य होय .यांचा वेगळाच ठसा रामभक्ती च्या रूपाने आजही करवीर वासियांच्या हृदयात जपून आहे. याच रामचंद्र पंतांना समर्थ रामदास स्वामींनी आपल्या प्रत्यक्ष भेटीत सोन्याचे कोरीव श्री रघुवीर यंत्र दिले. त्या दिवसापासूनच राम भक्तीची ज्योत गगनबावडा जहागिरीत प्रज्वलित झाली. रामचंद्र पंतांच्या नित्य पूजेत हे यंत्र व राम पंचायतनाच्या सुवर्णमूर्ती होत्या त्या आजही बावडेकर कुटुंबियांच्या पूजनात आहेत. राम भक्तिची ही पताका केवळ आपल्यापुरती मर्यादित न ठेवता गगनबावडा संस्थानातील प्रत्येक सामान्य व्यक्तीला सामावून घेऊन रामनवमी चा मोठा सोहळा साकारून रामचंद्र पंतांनी ती इतरांच्या खांद्यावर दिली. रामनवमीच्या या सोहळ्याला भारतातील नामवंत गायकांनी आपली गायन सेवा बजावलेली होती.

मुजुमदार घराण्याकडे रामनवमी सोहळ्याची दुर्मिळ पत्रे......

रामनवमी चा हा सोहळा चालू होण्यापूर्वी करवीर संस्थानातील मानकरी, सरदार ,यांना विशेष निमंत्रित केले जायचे. करवीर चे छत्रपती देखील या सोहळ्याला उपस्थित असायचे.
       अशाच एका पत्रामध्ये आमच्या मजुमदार घराण्यातील मागील सहाव्या पिढीतील बळवंत रावजी मुजुमदार यांना माधवराव मोरेश्वर पंत अमात्य हुकूमत पनाह संस्थान बावडा यांनी विशेष निमंत्रण पाठविले होते. 4 एप्रिल 1905 सालच्या या हॅन्डमेड कागदावरील हस्तलिखित मोडी पत्रातील चैत्र शुद्ध 1 सौम्यवारी रामनवमीचा सोहळा चालू होत असून यास उपस्थित राहण्याची विनंती केलेली दिसून येते.
      इ.स.1846 ब्रिटिश सरकारने नेमलेल्या मेजर ग्रॅहम यांच्या रिपोर्टनुसार संस्थान कोल्हापूर दरबारात मल्हार सखाराम मुजुमदार यांना  पंत अमात्य यांचे मुतालिक  म्हणून बसण्याची बैठक व्यवस्था होती.इस 17 व्या शतकातील गगनबावडा जहागीरीची मुजुमदार यांना दिलेली इतरही आज्ञापत्रे माझ्या संग्रहात आजही आहेत.
      गगनबावडा जहागिरीचा राम भक्तीचा साक्षीदार असणारा हा इतिहास आज या पत्रातून आपणास खूप काही सांगून जातो.
Back to content