चपेटदान मारूती - Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world

Go to content
मुळात ज्या रामायणातून मारुती प्रकट झाला त्या राम कथेच्या विविध आवृत्ती जगभर आजही प्रचलित आहेत. अगदी भारतात सुद्धा आनंद रामायण, वाल्मिकी रामायण अशा अनेक राम कथा प्रचलित आहेत.

चारित्र्य संपन्न, बुद्धिमान, अफाट सामर्थ्यशाली आणि पराकोटीची स्वामीनिष्ठा या गुणांनी मारुतीच व्यक्तिमत्व सजलेलं आहे. कधी रामपंचायतनात रामासमोर गुडघ्यावर नम करीत बसलेला किंवा रामासमोर नमस्कार मुद्रित उभा असलेला, तर कधी राम-लक्ष्मणांना खांद्यावरून घेऊन जाणारा, द्रोणागिरी; एक पर्वतच उचलून आणून लक्ष्मणाला जीवनदान देणारी संजीवनी उपलब्ध करणारा, आपल्या हृदयातील प्रभू रामचंद्राचे स्थान दाखविताना छाती फाडणारा, गदा उगारून राक्षसांच्या सेनेचा संहार करणारा, अतिश्रमामुळे निद्रिस्त अवस्थेतील अशी या मारुतीची विविध प्रकारची शिल्पे पहायला मिळतात.

'चपेटदान मारुती' हे हनुमानाचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप आहे. या स्वरूपामध्ये अशोकवनात रामदूत म्हणून सीतामाईची भेट घेतल्यानंतर त्या अशोकवाटिकेचा विध्वंस करणारा हनुमंत दाखविण्यात येतो. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेने हनुमंताने लंकेला भेट देऊन सीतामातेला प्रभुरामचंद्रांचा संदेश दिला. तेव्हा त्याची दूताची भूमिका असल्यामुळे तो निशस्त्र होता. अशोक वाटेच्या आरक्षणासाठी रावणाने राक्षस त्रि यांची नेमणूक केली होती त्यांच्या शस्त्र विरोधाला न जुमानता मारुतीने केवळ शरीर बळावर हे वन उध्वस्त केले. रामायणातील या घटनेचे वर्णन असलेले शिल्पांकन मारुतीच्या चपेटदान मारुती या स्वरूपात पाहायला मिळते.

आपल्या शरीराचा आकार इच्छेप्रमाणे लहान किंवा मोठा करण्याची विद्या मारुतीकडे होती. अशोकवाटिका उध्वस्त करताना त्यांनी आपल्या शरीराचे आकारमान वाढवले होते. त्याच्या हाताच्या फटक्याने मोठे मोठे वृक्ष जमीनदोस्त होत होते. मारुतीचा डावा हात त्याच्या कमरेवर टेकवून ठेवलेला असून त्या हातात उन्मळून काढलेला डेरेदार वृक्ष किंवा झाडाची फांदी धरलेली असते. मारुतीचा उजवा हात थप्पड मारण्याच्या अविर्भावात उगारलेला असतो. शेपटी उजवीकडून वरील बाजूकडे मस्तकावरून डाव्या बाजूला कमरेपर्यंत कमानी सारखी दाखविली जाते. या प्रकारच्या शिल्पाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे मारुतीची उभारलेली शेंडी जी मारुतीच्या क्रोधायमान अवस्थेचे प्रतीक आहे. मूर्तीच्या हातात व दंडावर कडे, गळ्यात अलंकार व पायात तोडे असतात.

आजन्म ब्रह्मचारी असलेल्या मारुतीच्या पायाखाली असलेले स्त्री शिल्प हे त्याचं वेगळेपण आहे. अशोकवाटीकेच्या रक्षणासाठी रावणाने नेमलेल्या राक्षस स्त्रियांनी मारुतीला सशस्त्र प्रतिकार केला. त्याला न जुमानता मारुतीने आपले विध्वंसाचे कार्य सुरूच ठेवले. या प्रसंगाचे शिल्पांकन म्हणून अशा शिल्पातील मारुतीच्या पाया खालील पराभूत अवस्थेतील सशस्त्र स्त्री दाखवली जाते. यासंदर्भात आणखी एक आख्यायिका अशी आहे की मारुतीच्या पायाखाली स्त्री म्हणजे शनीच्या साडेसातीचे प्रतिक आहे. म्हणून साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी अशा प्रकारच्या मारुतीची उपासना करावी अशी लोकमानसात श्रद्धा आहे.

एकंदरीतच रामायणातील अशोकवाटिकेच्या विध्वंस प्रसंगाचे यथार्थ चित्रण असलेल्या मारुतीच्या अशा मूर्ती दुर्मिळ असल्या तरी कोल्हापूर परिसरात मात्र अनेक मूर्ती पाहायला मिळतात. जोतिबा डोंगरावरील मंदिरात, जोतिबाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या बाजूला एक देवाष्टकात अशी मूर्ती आहे. शिवाय कोल्हापूरच्या पश्चिमेस असलेल्या कसबा बीड या प्राचीन इतिहास असलेल्या गावातील वेशीवरील मारुती अशाच प्रकारचा आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला कसबा बावडा येथील जुन्या मारूती मंदिरातील शिल्पही अशाच प्रकारचे आहे.

एका कवीने मारूतीचे वर्णन करताना रामप्रियाशरणदास असे म्हटले आहे. आपल्या परमाराध्य दैवताच्या पत्नीची रावणाच्या कैदेतील अशोकवाटीके मधील दयनीय अवस्था पाहून क्रोधायमान मारुतीची स्थिती दाखविणारे हे चपेटदान मारुतीचे शिल्प अतिशय बारकाव्यानिशी बनविण्यात आले असून मूर्ती शास्त्राच्या अभ्यासकांसाठी आणि भक्तांसाठी हे शिल्प महत्वाचे आहे.
Back to content